राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केले लक्ष्य

Foto
 नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाबाबत तात्पुरता निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीचा संदर्भ देत तृणमूल काँग्रेसच्या घडामोडींवर भाष्य केले.

शिवसेना पक्षनाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील नीरज कौल युक्तिवाद मांडत आहेत. याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याऐवजी ते गोठवण्यात का आले नाही, असा प्रश्न उपस्थित केलाय. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या पक्षनाव आणि चिन्हाबाबत घेतलेल्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधींची नेमकी पोस्ट काय?
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीचा संदर्भ देत म्हटले आहे की, आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस. प्रत्येकवेळी तोच पॅटर्न. पुढे त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप करत म्हटले आहे की, भाजपा व निवडणूक आयोग मिळून एखादा पक्ष फोडतात. मग त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह हिसकावून घेतलं जातं. राहुल गांधी यांनी या मुद्द्याला वोट चोरी आणि सरकार चोरीशी जोडत लोकशाहीबाबतही चिंता व्यक्त केली. जर आख्खा पक्षच चोरी होऊ शकतो, तर कोट्यवधी भारतीयांच्या मतांची चोरी होणं काही आश्चर्य वाटण्याची बाब नाही. वोट चोरी. सरकार चोरी. आता पक्षाचीदेखील चोरी. हे आपल्या लोकशाहीच्या पतनाचे प्रतीक झाले आहेत,फफ असे त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगावरही टीका
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या घटनात्मक भूमिकेचाही आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी ही जनतेच्या निर्णयाचं रक्षण करणं आहे; पण उलट आयोग अशा शक्तींना मदत करत आहे, जे जनतेचा कौलच फिरवत आहेत,  असा आरोप त्यांनी केला.
तसेच, ही लढाई फक्त ममता बॅनर्जींची नाही. ही अशा प्रत्येक राजकीय पक्षाची, प्रत्येक मतदाराची लढाई आहे, ज्याला स्वतंत्र व पारदर्शी निवडणुका हव्या आहेत,फफ असेही राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राहुल गांधींच्या या पोस्टनंतर तृणमूल काँग्रेसच्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील निर्णयासह शिवसेना प्रकरणाचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.